मुंबई, ठाणे : मुंबई, ठाणे, पालघर परिसराला बुधवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यत जनजीवन विस्कळीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. बुधवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत ६४.३२ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ५७.१० मिलिमीटर, तर पश्चिम उपनगरात ६६.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई आणि उपनगरांच्या तुलनेत ठाणे परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

अंबरनाथ, कल्याण तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी, काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसपासच्या सखल भागांत पाणी साचले. बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी या शहरांमध्ये अनेक मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होती. अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-अहमदनगर राज्यमार्ग, कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर आणि काटई-बदलापूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. ठाणे, भिवंडी शहरातही दिवसभर पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. भिवंडीत अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. नारपोली, दापोडे, अंजुरफाटा, काल्हेर, कशेळी भागात रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.

बुधवारी सकाळी ८.३० ते ४ या कालावधीत सर्वाधिक ४६१.५ मिमी पाऊस भिवंडी तालुक्यात झाला. त्या खालोखाल अंबरनाथ तालुक्यात ३८९.७५ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण तालुक्यात ३३९ मिमी, ठाणे २८४.५ मिमी, मुरबाड १६८.२५ मिमी तर शहापूर तालुक्यात ९३.७५ मिमी इतका पाऊस झाला आहे.

कोकणात पूरस्थिती

कोकणालाही मुसळधार पावसाने झोडपले. रत्नागिरी जिल्ह्यातील ८ पैकी ४ प्रमुख नद्यांचे पाणी शहरातील लोकवस्तीमध्ये शिरले. खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. खेडमध्ये जगबुडी आणि चिपळूणात वाशिष्ठी नदीला पूर आला. या दोन तालुक्यांतील सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

रायगड जिल्ह्यात सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, रसायनी, आपटा परिसराला पुराचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर मार्गासह अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीमुळे मुरुड, महाड, पोलादपूर, उरण येथील १७५ कुटुंबांतील ४०० जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याचे चित्र होते.   विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिखलदरा तालुक्यात वीज पडून सुनील मोती भास्कर (३५), नीलेश बजरंग भास्कर (२३) यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, मामुलवाडी येथे िभत कोसळून प्रताप गावंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा शुभम जखमी झाला.

माथेरानमध्ये २४ तासांत ३४२ मिमी पाऊस

रायगड जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत सरासरी १६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात माथेरानमध्ये विक्रमी ३४२ मिमी पाऊस झाला असून, कर्जत, खालापूर, पोलादपूर आणि पेण येथे २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

मुंबई-पुणे रेल्वेगाडय़ा रद्द

अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्याने मुंबई-पुणे रेल्वे गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गुरुवारी पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी- पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी- पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस आणि हैदराबाद – सीएसएमटी एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

पाच दिवस जोर

राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी दहा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबईसह बारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहील. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकलच्या १०० फेऱ्या रद्द

पावसाच्या तडाख्याने अनेक रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचण्याबरोबरच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बुधवारी दिवसभर कल्याण-कर्जत-कसारा आणि काही वेळेसाठी पनवेल-बेलापूर रेल्वे सेवा ठप्प झाली. दिवसभरात एकूण १०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

शाळांना आज सुट्टी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना गुरुवारी २० जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी असून, दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.