पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेला मोसमी पाऊस, या कारणांमुळे मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या १० दिवसांतच ओलांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर आहे; मात्र यंदा १ ते ११ जून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोसमी पाऊस दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ९ जूनला मुंबई उपनगरात २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. गुरुवारीही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. शुक्रवारी सकाळी अनेक भागांत हजेरी लावल्यानंतर दुपारच्या सुमारास पाऊस शांत झाला. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरा पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत होता. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सायंकाळी ८.१५ पर्यंत ३२.२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच अंधेरी येथे ५२.३२ मिलीमीटर, बोरिवली येथे ३८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे येथे शुक्र वारी रात्री ८.३० पर्यंत ८७.५ मिलीमीटर, कल्याण येथे ३०.८ मिलीमीटर, बेलापूर येथे २४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

तापमान सर्वसाधारण अंशांवर

गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली. शुक्रवारी मात्र  तापमान सर्वसाधारण अंशांवर स्थिरावले. सांताक्रूझ येथे ३०.९ तर, कुलाबा येथे ३०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घट दिसून आली.

 

मुंबई शहरात ५० टक्के  पाऊस

कु लाबा येथील नोंदीनुसार फक्त मुंबई शहरातील पावसाची संपूर्ण जून महिन्याची सरासरी ५४०.९ मिलीमीटर इतकी आहे. १ जूनपासून ११ जूनपर्यंत मुंबई शहरात झालेल्या पावसाचे प्रमाण २४७.२ मिलीमीटर इतके  आहे. त्यामुळे शहरातील पावसाने सरासरीच्या साधारण ५० टक्के  मजल मारल्याचे दिसत आहे.

पाऊसभान… बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि उर्वरित कोकणात मुसळधार पाऊस पडणार असून पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain fall meteorological department according to the records suburbs of mumbai monsoon rain akp