उपनगरांत दिवसभर मुसळधार; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबई आणि उपनगरांना तडाखा दिला. ठाणे, नवी मुंबई, वसई आणि पालघर येथे जोरदार सरींमुळे ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झाली आणि जनजीवन विस्कळित झाले. दुपारनंतर नवी मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरांत पावसाने रौद्ररूप धारण केले.

सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मुंबई उपनगरात ५८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुलनेने कुलाबा येथे कमी म्हणजेच १५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी रात्री उशिरापर्यंत उपनगरांत मात्र पाऊस थांबला नव्हता. त्यामुळे या भागांतील रस्तेवाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. पुढील तीन दिवस मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई पालिके च्या पर्जन्यजल मापक यंत्रणेवरील आकडेवारीनुसार सकाळी ८ ते रात्री ८ या बारा तासात शहर भागात २७.३८ मिमी पावसाची नोंद झाली तर पश्चिाम उपनगरात ५०.६२ आणि पूर्व उपनगरात ७६.९८ मिमी पावसाची नोंद झाली.

रविवार, सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असताना पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली. त्यानंतर पुन्हा पावसासाठी अनुकू ल स्थिती निर्माण झाल्याने मंगळवारपासून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्यास सुरूवात झाली.  डहाणू येथे ८४.६ मिलीमीटर, ठाणे येथे ७५ मिलीमीटर, रत्नागिरी येथे १९.८ मिलीमीटर, अलिबाग येथे ४.८ मिलीमीटर  पावसाची नोंद झाली.

ठाण्यात जोरधारा…

जोरधारांमुळे येथील कोपरी, ओवळा, वंदना सिनेमागृह परिसर, राबोडी परिसरात पाणी साचले.कोपरी, मुंब्रा, वृंदावन सोसायटी, घोडबंदर आनंदनगर या ठिकाणी वृक्षही कोसळले. भिवंडी येथील कशेळी-काल्हेर, पूर्णा, भाजी मंडई परिसरातील रस्त्यावर पाणी साचले.  कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्येही हीच परिस्थिती होती.

पाऊसभान…

दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणापर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र विरले असून ते आता दक्षिण गुजरात ते उत्तर के रळच्या किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार, तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

राज्यस्थिती…

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला गुरुवारी पावसाने झोडपले. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भात हलक्या सरींनी हजेरी लावली असून, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला मात्र पावसाची प्रतीक्षाच आहे.

तीनपट अधिक… 

गेल्या वर्षी १६ जून २०२० पर्यंत २८६.९ मिलीमीटर पाऊस सांताक्रू झ येथे नोंदवला गेला होता. तुलनेने यावर्षी १६ जूनपर्यंत जवळपास तिप्पट म्हणजे ७५७.७ मिलीमीटर पावसाची नोंद सांताक्रूझ येथे झाली. जून महिन्यातील सरासरी पावसाने पहिल्या १० दिवसांतच ओलांडली आहे.

रस्ते तुंबण्यात वाढ…

गेल्या पंधरवड्यात मुंबई आणि उपनगरांत तुलनेने अतिमुसळधार पाऊस कोसळत नसताना रस्ते मात्र तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील काही भागांत पाणी साचणारी नवी केंद्रे तयार झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक दिसत आहे. पावसाळ्याच्या आरंभीच ही स्थिती असल्याने आणखी रौद्र पावसात काय स्थिती होईल, याबाबत नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

रेवदंडा खाडीत गुरुवारी सकाळी मालवाहू

तराफा कलंडला. पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. तीन खलाशांना बोटीच्या साहाय्याने आणि उर्वरित १३ जणांना हेलिकॉप्टरद्वारे वाचविण्यात यश आले.

वसई-विरारला फटका… वसई पूर्वेच्या औद्योगिक परिसरातील कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने काम बंद पडले. विरारच्या फुलपाडा येथे चार म्हशी पाण्यात वाहून गेल्या. वसईजवळील अनेक गावे जलमय झाली.  पेरणी केलेला भात वाहून गेला.

Story img Loader