मुंबई : मुंबई तसेच राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरांत मागील दोन तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे‌. पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने हा संपूर्ण आठवडा मुंबई तसेच राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत २३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १५ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे परिसरात १३ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवार आणि बुधवार ठाण्यात मुसळधार (६४.५ मिमी ते ११५.५मिमी) ते अतिमुसळधार (११५.६ मिमी ते २०४.४ मिमी) पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आजपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या रखडलेल्या फाईली मार्गी लागूनही मदतीत अडचण!

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा – रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर</p>

मुसळधार पावसाचा इशारा – पालघर, पुणे,अमरावती

वादळी पावसाचा इशारा – मुंबई, ठाणे, जळगाव, चंद्रपूर, नाशिक,नागपूर यवतमाळ, गडचिरोली, जालना