लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Heavy Rain Alert Mumbai Maharashtra : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत ढगाळ वातावरणसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, रविवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील काही दिवस मुंबईत अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत होत्या. दिवसभर मळभ आणि तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप असे वातावरण होते. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांत पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुलुंड, कांजूरमार्ग आणि पवई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आणखी वाचा-सत्ताधाऱ्यांच्या ११ साखर कारखान्यांना मदत

मुंबई बरोबरच ठाणे परिसरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत कुलाबा येथे (३७.८ मिमी), सांताक्रूझ (४७.१ मिमी), दहिसर (३२ मिमी), राममंदिर (५०.५ मिमी), विक्रोळी (५८.५ मिमी), चेंबूर (३२ मिमी), शीव(७८ मिमी), माटुंगा (५७ मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, सायंकाळनंतर मुंबईतील पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे‌ आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain forecast in mumbai more than 50 mm of rain recorded in many places in last 5 hours mumbai print news mrj
Show comments