लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनच्या अखेरीस मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई तसेच उपनगरांत गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ०.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २.१ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण तसेच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-जे. जे. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे, रात्रपाळीचे कर्मचारी कामावर रूजू
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईत उकाडा जाणवू लागला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, तसेच आर्द्रतेमुळे उकाडा वाढू लागला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, पुणे, कोल्हापूर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावासची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा कायम आहे.