लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून मुंबईत पावसाचा जोर वाढत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, सोमवारी मुंबईत अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी देखील पावसाचा जोर कायम होता. शहरातील दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पाऊस कोसळत होता.

आणखी वाचा-पावसाळ्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे सुरूच

मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. या कालावधीत रायगड, रत्नागिरी भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी संपूर्ण दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी हलक्या सरी कोसळतील. त्यानंतर सोमवारी पुन्हा पावसाचा जोर वाढेल. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईकरांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली आहे. तसेच मुंबईच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३३ मिमी पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा-मुंबई : वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला कर्नाटक पोलिसांकडून अटक

मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाची, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापला असून मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले. यामुळे पुढील दोन दिवसांत राजस्थानचा काही भाग , हिमाचल प्रदेशचा काही भाग व्यापेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.