मुंबई : राज्यात सोमवारपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारनंतर ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील छायाचित्र मित्राला पाठवले, अल्पवयीन मुलासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : नवीन तारीख मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ, प्रचाराची रणधुमाळी शिगेला

मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.