रेल्वे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांचे अजब वक्तव्य
‘पूर आला त्याला आम्ही काहीही करू शकत नाही, मुंबईत रुळांवर पाणी भरते तेव्हा कोण काय करते? हे अजब वक्तव्य आहे पश्चिम व मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांचे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडण्यास जबाबदार कोण, लोको पायलट की त्याला पूर आला असतानाही पुढे जाण्याचा सिग्नल देणारी यंत्रणा? असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईऐवजी ‘पूर आला त्याला आम्ही काहीही करू शकत नाही,’ असे वक्तव्य महाव्यवस्थापक गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला प्रतिक्रिया देताना केले. मुंबईत पाणी भरते, तेव्हा काय करतात, हे तुम्हीच सांगा, असा प्रतिप्रश्नही गुप्ता यांनी केला.
महालक्ष्मी एक्स्प्रेसला कल्याण ते अंबरनाथ प्रवासासाठी तीन तास लागले. ती पहाटे ३ वाजता बदलापूर स्थानकात पोहोचली. बदलापूर, अंबरनाथ स्थानकात गाडी थांबल्यानंतर प्रवाशांनी लोको पायलटला गाडी पुढे नेऊ नका अशी विनंती केल्याचे सांगण्यात येते. परंतु सिग्नल मिळाल्याने त्याने धोका पत्करला.
गाडी पुढे नेण्याची सूचना मध्य रेल्वे मुख्य नियंत्रकांकडून (कंट्रोलर) स्टेशन मास्तरला दिली जाते आणि सर्व काही आलबेल असल्याचे पाहून स्टेशन मास्तर गाडीला पुढे जाण्याचा सिग्नल देतात. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यातून पुढे नेण्याची सूचना कोणी दिली? रुळांवर गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेमार्ग पुराखाली गेल्याची माहिती दिली नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रेल्वेच्या संबंधित यंत्रणेने केलेल्या हलगर्जीपणाबद्दल कारवाई होणार का असे मध्य व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता यांना विचारले असता, पूर आला त्याला आम्ही काय करणार, असे अजब वक्तव्य करून जबाबदारी झटकली. गाडी चालवण्यासाठी एक यंत्रणा असते आणि त्यानुसार आम्ही आमचे काम केले. अचानक पूर आला, तर काहीही करू शकत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरेही त्यांनी दिली.
चूक कोणाची? : रेल्वे नियंत्रकाने सर्व माहिती घेतली की तो स्टेशन मास्तरला सूचना करतो. त्यानुसार परिस्थिती पाहून स्टेशन मास्तर सिग्नल देतो. त्यामुळेच सिग्नल मिळताच महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या लोको पायलटनेही गाडी पुढे नेली असेल, असे सांगण्यात येते. या प्रकरणी लोको पायलटपेक्षा संबंधित कर्मचाऱ्यांचीच चौकशी होणे गरजेचे असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
रेल्वे यंत्रणा निष्क्रीय
गेल्या वर्षी पावसाळ्यात पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा, विरार स्थानकांदरम्यान रुळांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. त्या वेळी १० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस आणि काही लोकलही अडकल्या होत्या. त्या वेळीही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक यंत्रणांनी प्रवाशांची सुटका केली होती. यंदा २ जुलैला झालेल्या पावसामुळेही मध्य रेल्वेवर दादर ते कांजुरमार्ग स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे २२ लोकल आणि सहा मेल-एक्स्प्रेस पाण्यात अडकल्या होत्या. त्यांतूनही हजारो प्रवाशांची सुटका करण्याचे काम रात्रभर करण्यात आले. त्यानंतर आता २७ जुलै रोजीही वांगणी ते बदलापूर दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. याबाबतीत रेल्वेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातही महाव्यवस्थापक गुप्ता यांनी पूर किंवा पाणी आले त्याला काहीच करू शकत नाही, असेच उत्तर दिले.