गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारीही मुंबईत मुक्काम कायम होता. दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढले. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली आणि मुंबईकरांना तारांबळ करीतच कार्यालय गाठावे लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने पालिका अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या उंच लाटांचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी चौपाटय़ांवर गर्दी केली होती.
गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला असून मुंबईकर सुखावले आहेत. शनिवारी चौथ्या दिवशीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतच होता. परिणामी काही ठिकाणी पाणी साचून रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. तसेच पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. रेल्वे गाडय़ा तब्बल अर्धा तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे नोगरदारांचे चांगलेच हाल झाले. तसेच कार्यालयातून घरी निघालेल्या नोकरदारांना उशीरा धावणाऱ्या रेल्वे गाडय़ांमुळे घर गाठण्यास बराच विलंब झाला. तसेच दुपारी भरतीच्या वेळी पावसाचे कोसळणे सुरूच राहिल्याने हिंदमाता, परळ टीटी, वरळी, सायन, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, वांद्रे, मालाड आदी ठिकाणचे रस्ते जलमय झाले आणि वाहतुकीला त्याचा फटका बसला.
शनिवारी सायंकाळी ५.३० पर्यंत कुलाबा वेधशाळेत ३८.२ मि.मि., तर सांताक्रूझ येथे ४१.१ मि.मि. पावसाची नोंद झाली.
रेल्वे वेळापत्रक कोलमडले
मुसळधार पावसामुळे शनिवारीही पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. पावसाच्या तडाख्यात मध्य रेल्वेवरील सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच काही ठिकाणी रेल्वे मार्गात साचलेले पाणी आणि चुनाभट्टी येथे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतुकीला फटका बसला होता. मध्य रेल्वेवरील ३८ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच पाच गाडय़ा अंशत: रद्द करण्यात आल्.ा तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावत होती.
सकाळपासून कोसळणारा पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे रेल्वे मार्गावरील सखल भाग जलमय झाले होते. पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्टरोड, मध्य रेल्वेवरील विक्रोळी, परळ, मुलुंड आणि हार्बरवली  कुर्ला. चेंबूर, मानखुर्द आदी ठिकाणचे लोहमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली. तसेच चुनाभट्टी येथे रेल्वेगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील सेवेवर  परिणाम झाला. सकाळी १० ते दुपारी ४.३० या काळातील ३८  फेऱ्या पूर्णत: व पाच फेऱ्या अंशत: रद्द कराव्या लागल्या.
आज ४.८३ मीटर उंच लाट
शनिवारी दुपारी १२.१२ च्या सुमारास ४.६३ मीटर उंचीची लाट समुद्रकिनाऱ्यावर धडकू लागल्या आणि अनेक मुंबईकरांना भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी गिरगाव, वरळी, दादर, जुहू आदी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी केली होती. मात्र खवळलेल्या समुद्रामध्ये कोणी उतरू नये यासाठी किनाऱ्यांवर तैनात असलेले पोलीस, पालिका कर्मचारी आणि जीवरक्षक दक्षता घेत होते. रविवारी दुपारी १२.५८ वाजता भरती येणार असून किनाऱ्यावर ४.८३ मीटर उंचीची लाट धडकण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी किनाऱ्यांवर फिरण्यासाठी जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
दोन दुर्घटनांमध्ये तीन ठार
मुसळधार पावसाच्या तडाख्यात छोटय़ा इमारतींचे काही भाग कोसळून झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. जखमींवर जे. जे. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवडी येथील हेर बंदर रोडवरील जयभीन नगरमधील लकी मेन्शन या एकमजली इमारतीचा काही भाग शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या कोसळला आणि पदपथावरील तिघे ढिगाऱ्याखाली सापडले. काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढले आणि त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच दयाशंकर मिश्रा (६०) आणि रुद्रमणी उपाध्याय (४५) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्रिभूवननाथ उपाध्याय (५८) गंभीर जखमी झाले . कुलाबा येथील प्रकाश पेठे मार्गावर गणेशमूर्ती नगरातील बांधकाम सुरू असलेल्या एक मजली इमारतीचा भाग शनिवारी  १०.४५ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत मसरुफ शेख (१८) ठार झाला. तर शौरत अली (१८), युसुफ शेख (३९), सुदीप हजारे (२९), अहमद कलाम (४५), मिनारुल शेख ९३३) हे जखमी झाले. जखमींना सेंट र्जार्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा