मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या चोवीस तासांपासून मुंबईत चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मुंबईशिवाय, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणीही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा रेल्वेच्या तिन्ही सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा २० मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने सुरु आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही ५ मिनिटे उशिराने सुरु आहे.
मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावर झालेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही सेवा पूर्ववत होईल. तसेच काही वेळापूर्वी बदलापूर ते कल्याण ही लोकलसेवाही पुढील सुचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात त्यासंदर्भातली घोषणा करण्यात येत होती. सायन आणि कुर्ला या दोन स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत झालेल्या पावसाचा विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. विमानांची उड्डाणं ३० मिनिटे उशिराने सुरु आहेत. एवढंच नाही तर मुंबईतल्या सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. गांधी मार्केट भागात पावसामुळे पाणी साठू लागले आहे तर इतर सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या २६ जुलैच्या पावसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कल्याण शीळफाटा भागात पाणी साठले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसर, दावडी या ठिकाणीही पाणी साठले आहे.
मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेही बंद करण्यात आला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मागील तासाभरात दादरमध्ये २० मिमी, अंधेरीत ३६ मिमी, कुर्ला या ठिकाणी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी २ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता. त्यादिवशी मध्य रेल्वे १६ तास ठप्प होती. आता आजही ऑफिस गाठणाऱ्या चाकरमान्यांना उशिराचा फटका सहन करावा लागणार आहे.