मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे काही भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली होती. दरम्यान, मुंबईत रविवारी मुसळधार पावसाचा तर सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबईत बेलापूर, खारघर आणि पनवेल परिसरातही शनिवारी मुसळधार पाऊस होता. शनिवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांत पावसाने जोर धरला. दक्षिण मुंबईसह दादर, वरळी, वांद्रे, घाटकोपर, अंधेरी, पवई, कुर्ला आणि चेंबूर आदी परिसरात दिवसभर जोरदार पाऊस पडत होता. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आणि याचा वाहतुकीवर परिणाम झाला. शीव मार्ग क्रमांक २४, शेल कॉलनी, नॅशनल कॉलेज वांद्रे (प.) येथे पाणी साचल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या. पाणी ओसरल्यानंतर बसची वाहतूक पूर्ववत झाली.
दहिसर आणि अंधेरी भुयारी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, कांदिवली, बोरिवली येथील गोराई परिसर, कुर्ला आदी ठिकाणे जलमय झाली होती.
हेही वाचा >>> पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; मात्र मुंबईतील पाणीकपात कायम; धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर
कोकण, घाटमाथ्यावर जोर
मुंबईसह राज्यातील इतर भागातही मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे.
कसारा लोकलमध्ये गळती
शहापूर : मध्य रेल्वेच्या मार्गावरील कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकलच्या छतामधून पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचे चित्र शनिवारी सकाळी पाहायला मिळाले. या गळतीमुळे कामावर निघालेले अनेक नोकरदार भिजल्याने त्यांच्यामधून रेल्वेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता. ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. याच काळात सकाळी ७.२२ ला कसाऱ्याहून ‘सीएसएमटी’ला जाणाऱ्या लोकलच्या एका डब्यातील छतामधून चक्क पावसाच्या पाण्याची गळती होत होती. या लोकलने कामावर निघालेल्या नोकरदारांना याचा त्रास झाला.