मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे. सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाने झोडपून काढल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गांची रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. सकाळपासून  सुरू असलेल्या पावसाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत  उसंत घेतलेली नाही. या पावसामुळे मुंबईकरांना २००५ मध्ये पडलेल्या २६ जुलैच्या पावसाची आठवण झाली आहे. बस, टॅक्सी, रिक्षा यांचा आधार घेऊन घर गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

वाचा- पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई आणि लगतच्या पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा

मागील २४ तासांमध्ये मुंबईत १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. उद्याही अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वेही ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. यामुळे वेगवान मुंबईचा वेग अतिशय मंदावला आहे.

मुंबईत झालेला मुसळधार पाऊस लक्षात घेता एनडीआरएफच्या तीन पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पुण्याहून एनडीआरएफची दोन पथके मुंबईत येण्याच्या तयारीत आहेत. मागील ९ तासांमध्ये दक्षिण मुंबईत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये ४८ तासांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाकडून सोमवारी देण्यात आला होता. मात्र कुठेही ढगफुटी झाली नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपत्ती निवारण कक्षात; शहरातील स्थितीचा घेतला आढावा
  • वांद्रे-वरळी सी लिंकचा दक्षिण मुंबईकडे जाणारा मार्ग काही वेळ वाहतुकीसाठी बंद; वाहतूक कोंडीमुळे निर्णय
  • शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली; मुंबई महापालिकेची माहिती
  •  शहर आणि उपनगरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी १३६ पंप कार्यरत; पाण्याचा उपसा सुरू
  •  महापालिकेची ६ पंम्पिंग स्टेशन्स पूर्ण क्षमतेसह सुरू; पालिकेची माहिती
  • पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरांमध्ये पर्जनवृष्टीचा इशारा
  • सकाळी ८.३० पासून १०० मिमी पावसाची नोंद
  • आपत्कालीन स्थितीत मुंबई महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक – १९१६
  • तीन जागी भिंती कोसळल्याच्या घटना
  • १६ जागांवर शॉर्ट सर्किट झाल्याच्या घटना
  • २३ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या, फांद्या कोसळल्याचा घटना
  • ३ तासांमध्ये (सकाळी ८.३० ते ११.३०) सांताक्रूझ वेधशाळेकडून ८६ मिलीमीटर पावसाची नोंद
  • मागील २४ तासांमध्ये ६५ मिलीमीटर पावसाची नोंद
  •  मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचले
  • संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; उत्तर कोकणात सर्वाधिक पावसाची शक्यता
  • पुढील २४ तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टी होणार; हवामान खात्याचा अंदाज
  •  हवामानाच्या स्थितीचा दर १५ मिनिटांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत; हमानान खात्याची माहिती
  • महापालिकेच्या सर्व शाळांना पावसामुळे सुट्टी
  • मुंबईतील डबेवाल्यांची सेवा विस्कळीत
  •  हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्णपणे ठप्प, पश्चिम रेल्वे विस्कळीत
  •  संध्याकाळी ४.३० वाजता समुद्राला भरती
  • लोअर परेल आणि एल्फिन्स्टन दरम्यान रुळावर झाड पडल्यानं स्लो मार्गावरील रेल्वे वाहतूक फास्ट ट्रॅकवर
  •  पुढील ४८ तासांमध्ये मुंबई आणि लगतच्या पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा
  •  मुंबईसह उपनगराला पावसाची जोरदार बॅटिंग; लालबाग, हिंदमाता, अंधेरीत पाणी साचले