पहिल्या मान्सून रविवारचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटल्यानंतर आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाने उसंत न घेतल्याने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. काल (रविवार) दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईच्या सखल भागात आज पाणी साचायला सुरूवात झाली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळाले. पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत पण धीम्या गतीने सुरू असली तरी मध्यरेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटे उशीराने सुरू आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने बहुतेक गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.  
मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू असली तरी मालाड, अंधेरी सब वे, बहार जंक्शन, मिलिंद नगर, हिंद माता आणि ठाण्यात तीन हात नाका परिसरात पाणी साचलं आहे.
सांताक्रुझ वेधशाळेत ११३ मिमी, कुलाबा ७० मिमी, नवी मुंबई परिसरात ४३ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. कल्याण शहरातही रात्री १२ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १०८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुपारी १.०६ वाजता मुंबई किनाऱ्यावर ४.२३ मीटर उंचीची हायटाईड येण्याचा अंदाजही वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.

Story img Loader