मुंबई आणि मुंबई उपनगरात शुक्रवारी दुपारपासूनच पावसाने जोर धरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुककोंडीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने 26 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारपासूनच मुसळधार पावसाने मुंबईत हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. मागील एका तासात अंधेरीत 36 मिमी, दादरमध्ये 20 मिमी तर कुर्ल्यात 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांकडून 26 जुलैसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतुककोडीही झाली आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर ठाणे परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. याव्यतिरिक्त दादर, हिंदमाता, माटुंगा आणि वडाळा भागातही पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वे देखील बंद झाला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला असून विमानांचे उड्डाणही अर्धा तास विलंबाने होत आहे. तर रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसला असून मध्ये आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. पुढील काही तासांमध्ये विजांच्या कडकडांसह मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Story img Loader