मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात संततधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि घाट भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या काही भागात रविवारी रात्री ३ तासांत ४० ते ५० मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. रविवार सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ४४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री ८.३० पर्यंत १३.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. सांताक्रूझ केंद्रात १०१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रविवारी रात्री ८.३० पर्यंत २०.१ मिमी पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून, मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘म्हाडा’च्या जमिनींवरील बेकायदा ओळखपत्रधारकांमुळे पुनर्विकासात अडसर; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

हेही वाचा – धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

रायगड जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

रायगड जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्याला सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांना प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी उशिरा सुट्टी जाहीर केली आहे.