मुंबई : गेला जवळपास महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. दमदार पाऊस सुरू होताच शहरात पडझडीच्या आणि पाणी साचण्याचे प्रकार झाले. पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत बुधवार रात्रीपासूनच संततधार झाली गुरुवारीही पावसाने उसंत घेतली नाही. सकाळी पावसाचा जोर वाढला. दुपारी काही काळ मंदावलेला पाऊस सायंकाळी पुन्हा सुरू झाला. वाऱ्याचा वेग आणि तिरप्या कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी छत्री असून देखील मुंबईकर पूर्णत: भिजून गेले.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) सांताक्रुझ केंद्राने सरासरी ४१.४ मिमी आणि कुलाबा केंद्राने सरासरी ३३.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद केली. गुरूवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा केंद्रात १२५.६ मिमि तर सांताक्रुझ केंद्रात सरासरी ५२.४ मिमि पावसाची नोंद झाली. त्यानंतरही रात्रभर शहर आणि उपनगरात पाऊस सुरूच होता.
दक्षिण गुजरात तटपासून उत्तर कर्नाटक तटापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
उपयुक्त पाण्याचा साठा (दशलक्ष लिटरमध्ये)
२०२२ १,५२,१५३
२०२१ २,५७,८३५
२०२० १,२१,२७८
सलामीलाच पडझड..
मुंबईत पावसाचा जोर वाढू लागला असला तरी अद्याप मुसळधार पावसाने मुंबईला तडाखा दिलेला नाही. मात्र, पाऊस सुरू होत नाही तोच शहरांत पडझडीची सुरूवात झाली आहे. शहरात २ ठिकाणी बांधकामाचा भाग गुरूवारी पडला. मुंबईत शहरात ४, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगर १ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १० ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्या.
लोकल सेवा विस्कळीत
मुंबई : गुरुवारी दिवसभर पडत असलेल्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीलाही बसला. दादर ते परळ स्थानकादरम्यान सिग्नलमध्ये (पॉईंट) तांत्रिक बिघाड, त्यातच शीव, माटुंगा स्थानकांत रुळाजवळ काही प्रमाणात साचलेले पाणी यांमुळे मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच गुरुवारी रात्री कोलमडले, तर सांताक्रुझ स्थानकादरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचीही वाहतूकही विलंबाने धावू लागली. मुंबईतील ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
दादर ते परळ स्थानकादरम्यान रात्री पावणे नऊच्या सुमारास सिग्नलमध्ये (पॉईंट बिघाड) बिघाड झाला. त्याचा परिणाम सीएसएमटी ते ठाणे दरम्यान धीम्या लोकल गाडय़ांना बसला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी एक तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे लोकल वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. त्यातच रात्री शीव, माटुंगा स्थानकांत रुळावर काही पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने वेळापत्रक आणखी कोलमडले आणि लोकलचा वेग आणखी मंदावला. लोकलच्या एकामागोमाग एक रांगाच लागल्या. त्यामुळे जवळचे स्थानक गाठण्यासाठी प्रवासी रुळांवरूनही चालत जाणे पसंत करत होते.
बिघाड दुरुस्त झाल्यानंतर लोकल अर्धा तास उशिराने धावू लागल्याने लोकल गाडय़ांना प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. विलंबाने धावत असलेल्या लोकलमुळे कामावरून घरी जाणाऱ्यांना लेटमार्क लागला. रात्री उशिरापर्यंत लोकल विलंबानेच धावत होत्या. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ स्थानकाजवळही रात्री पावणे नऊच्या सुमारास सिग्नल बिघाड झाल्या. त्यामुळे धीम्या लोकल उशिराने धावू लागल्या. याचा फटका प्रवाशांना बसला.
रस्ते वाहतुकीलाही फटका
दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी संध्याकाळपासून जोर धरला. शहर भागात पावसाचा जोर खूप जास्त होता. रात्री आठ वाजेपर्यंत शहर भागात १२० मिमी पावसाची नोंद झाली, तर त्याखालोखाल पश्चिम उपनगरात ७८ आणि पूर्व उपनगरात ५८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अंधेरी सब वे, हिंदूमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, शीव, काळाचौकी आदी काही सखल भागांत काही प्रमाणात पाणी साचले. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. बेस्टचे अनेक बसमार्ग वळवण्यात आले. तर साचलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.