मुंबईत पावसाचे धुमशान सुरू असून येत्या २४ तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पावसात मुंबईच्या ‘लाईफलाईन’चे नेहमीचे रडगाणे पुन्हा सुरू झाले असून पश्चिम, मध्य, हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकससेवा २० मिनिटांनी उशीराने सुरू आहे. वाहतुकीलाही पावसाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली आहे. पेडर रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोडवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे तर, वसई-विरारमध्येही दमदार पाऊस सुरू आहे. वसईमध्ये तब्बल १२३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
ठाण्यात देखील यावेळी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे परिसरात दिवसभरात तब्बल ४६० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि समुद्रालाही उधाण येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱयाबाजूला नवी मुंबई, पालघर परिसरालाही पावसाने चांगले झोडपले आहे. पालघरमधील सुर्या, वैतरणा नदीला पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Story img Loader