मुंबई : मागील तीन ते चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गुरुवारपासून संततधार कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे तुळशी धरण भरुन वाहू लागले आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. आज पहाटेपासून शहर तसेच उपनगरांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३.३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ९२.९ मिमी पावसाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हेही वाचा : जागा काढून घेतल्याने अश्व शर्यतींच्या शुल्कात कपात
आज पावसाचा अंदाज
अति मुसळधार ते मुसळधार
रायगड, रत्नागिरी, सातारा,
मुसळधार
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर , जालना , परभणी
वादळी वाऱ्यासह पाऊस
धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली , गोंदिया
हेही वाचा : म्हाडाकडून गोरेगावमध्ये आणखी अडीच हजार घरे
पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली
मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुक मंदावली आहे. मात्र रविवार रस्त्यावर तुलनेने वाहने कमी असल्यामुळे तेवढा परिणाम जाणवलेला नाही. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. त्यात किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला ठिकाणांचा समावेश आहे. वाकोला येथे अपघातामुळे वाहतुक संथ गतीने सुरू होती. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतुक मंद गतीने सुरू होती. त्याशिवाय अंधेरी सबवे येथेही पाणी साचले होते. कुर्ला एलबीएस रोड परिसरातही वाहने संथ गतीने चालत होती. वाकोला पुलावर अपघात झाल्यामुळे दक्षिण मार्गिकेवरील वाहतुक संथ गतीने सुरू होती. रात्री मिलन सबवे येथेही अपघात झाल्यामुळे तेथेही वाहतुकीचा वेग मंदावला होता. तसेच रात्री मिलन सबवे येथे पाणी साचल्यामुळे तेथील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पण रविवार असल्यामुळे रस्त्यावर कमी वाहने असल्यामुळे वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नाही.