कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पाऊस धारा कोसळतील, असे भाकीत हवामान विभागाने केले आहे.
अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. राज्यभरात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे ९.४ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ३.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ ते १७ जून या काळात कुलाबा येथे १२९.७ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ९८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली.