मुसळधार पावसाच्या दणक्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच रेल्वे, रस्ते वाहतुकीचे वेळापत्रक पार विस्कटून गेले. उपनगरांतून मुंबईकडे येणारे रस्ते तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनांच्या दोन-तीन किलोमीटरच्या रांगांनी झाकून गेले. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने हार्बर रेल्वे काही काळ बंद पडली तर मध्य रेल्वेवर गाडय़ा पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेच्या ६० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळच्या या मुसळधारवृष्टीने हा दिवस यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला, शिवाय गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंदही बुधवारी सकाळी झाली. या मोसमातील सर्वात मोठी भरती दुपारी असल्याने मुंबई पाण्याखाली जाणार अशी भीती वाटत असताना पावसाने त्यापूर्वीच आवरते घेत मुंबईकरांची सुटका केली. बुधवारची सकाळच मुसळधार पावसाच्या संगतीने उजाडल्याने मुंबई पुन्हा पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे नसल्याने ‘गरज असेल तरच बाहेर पडा’ अशी सूचना नागरिकांना देण्यात आली. परिणामी अनेक शाळांना सुटी देण्यात आली तर चाकरमान्यांनी थेट रजा टाकत पावसासमोर शरणागती पत्करली. धावत्या मुंबईचा वेग सकाळीच रोखला गेला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील गजबजलेले रस्ते, लोकलगाडय़ा रिकाम्या दिसत होत्या. गर्दीने ओसंडून वाहणारी मुंबई आणि रेल्वेस्थानके शांत-शांत दिसत होती. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला.
शहरात विविध ठिकाणी घराच्या भिंती पडण्याच्या पाच घटना घडल्या. त्यात एकजण जखमी झाला. आठ ठिकाणी झाले पडली. त्यामुळे चर्चगेट येथे चार ते पाच गाडय़ांचे नुकसान झाले. हिंदमाता, शीव, काळाचौकी, शिवडी, महेश्वरी उद्यान, वडाळा, धारावी, नेपियन्सी रोड, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, वांद्रे येथील सखल भागात पाणी साचले होते. येथून जाणारे बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले. सखल भागात साचलेले पाणी उपसण्यासाठी पूर्व उपनगरात १५, पश्चिम उपनगरात ८ तर दक्षिण भागात ३७ ठिकाणी पालिकेने पंप लावले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्रावर ४.८८ मीटरची भरती होती. मात्र त्यावेळी पाऊस ओसरला असल्याने पालिका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
२४ तासांत २१८ मिमी
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासांत उपनगरात २१५.६ मिमी तर शहरात २१८.६ मिमी पाऊस झाला. या मोसमातील हा सर्वात मोठा पाऊस आहे. २६ जुलै २००५ रोजी पडलेल्या ९४४ मिमी या ढगफुटीनंतर २०० मिमीहून अधिक पाऊस पडण्याची गेल्या दहा वर्षांतील ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २००९, २००७ आणि २००६ मध्ये पावसाने एका दिवसात २०० मिमीचा टप्पा ओलांडला होता. गेले चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने तापमानही खाली उतरले आहे. सांताक्रूझ येथे बुधवारी सकाळी २२. ६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. गेल्या दहा वर्षांतील जुलैमधील हे सर्वात कमी किमान तापमान आहे.
अतिवृष्टीचा इशारा मागे
पुढील तीन दिवस कोकणसह मुंबईत अतिवृष्टीचा इशारा मागे घेण्यात आला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६.१ मिमी तर कुलाबा येथे १२.७ मिमी पाऊस झाला. पश्चिम किनारपट्टीवर असलेला ढगांचा पट्टा आता गुजरातकडे सरकला असून तिथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संशोधक के. एस. होसाळीकर यांनी दिली.
उत्साहाला भरती
बुधवारची सकाळ उजाडली तीच काळोखाने भरलेली.. पावसाच्या काळ्या दाट ढगांनी सूर्याचा एकही किरण जमिनीवर पोहोचू न देण्याचा विडा उचललेला.. मंगळवारी पावसाने दाखवलेले तांडवनृत्य आणि अतिवृष्टीचा इशारा.. मुसळधार कोसळत असलेल्या धारा आणि जोडीला सुटलेले गार वारे.. या सगळ्या परिस्थितीत आज काय वाढून ठेवले आहे, असा विचार करीत अनेकांनी घरी बसण्यातच शहाणपण मानले. पण दोन तासांतच पावसाचा जोर ओसरला आणि मग अनेकांनी आयत्या मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत किनाऱ्यावर येणाऱ्या उंच लाटांच्या दर्शनासाठी मोर्चा वळविला. लाटांमुळे उसळणाऱ्या फवाऱ्यात चिंब भिजण्याचा आनंद गेट वे, मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क, जुहू किनाऱ्यावर अनेकांनी लुटला अन् बुधवारी मुंबईत सर्वत्र पाऊसदिन साजरा झाला. अतिवृष्टीचा इशारा आणि त्यातच दुपारी समुद्रात सर्वात मोठय़ा लाटा उसळणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेकडून केले जात होते. दुपारच्या वेळेला असलेल्या शाळा सोडून देण्यास सांगण्यात आले होते. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. अनेक सखल भागात साचलेले पाणीही कमी होऊ लागले. सर्वात उंच लाट किनाऱ्यावर आदळून गेली. वरळी कोळीवाडा, खारदांडा, वेसावा गावांत घराघरात पाणी शिरले अन् नंतर सारे काही आलवेल झाले.
मोसमातील विक्रमी पाऊस
बुधवार हा दिवस यंदा सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला, शिवाय गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंदही बुधवारी सकाळी झाली.