घरातील पाच, सात दिवसांच्या गणरायांना निरोप देऊन मोठय़ा गणरायांचे दर्शन घेण्यास निघालेल्यांची रविवारी सायंकाळनंतर आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: कोंडी केली. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडून पडल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वच स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
सायंकाळनंतर प्रथम उपनगरासह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा सर्वात मोठा फटका गणेशभक्तांना बसला. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून मुंबईतील प्रसिद्ध गणरायाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांना पावसानेच गाठले. त्यामुळे गणेशदर्शनाच्या रांगा सोडून भाविकांना आडोश्यांसाठी धावपळ करावी लागली.
पावसाचा जोर इतका होता की कांजूरमार्ग, विक्रोळी, बदलापूर आदी ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साठले. पावसाच्या फटक्याने पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली. धिम्या मार्गावरील सेवेला याचा सर्वाधिक फटका बसला. लोकलसेवा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती. कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, कळवा, वाशिंद, आसनगाव येथे गाडय़ा अतिशय संथ गतीने पुढे सरकत होत्या. घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसला. पावसामुळे दर्शनाचा कार्यक्रम अर्धवट टाकून रेल्वेस्थानक गाठणाऱ्यांची गर्दी रेल्वे स्थानकांवर उसळली. दरम्यान, तुळशीवाडी येथे वीज पडल्याने तिघे भाजल्याचे वृत्त आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा