मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे, पुणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार मुंबई शहर, उपनगरांत पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.
हवामान विभागाने मुंबईत गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महानगरपालिका आयुक्त, प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील शाळा, तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्याचबरोबर मुंबईतील नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १४५.१ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
हेही वाचा – दोन भाऊ एकत्र येणार का? राज ठाकरेंबरोबरच्या युतीवर उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले….
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. त्याचबरोबर वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खालापूरजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली.
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शाळा, तसेच महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात झालेला पाऊस
पेण- ३०३ मिलीमीटर
तळा- २०५ मिलीमीटर
पनवेल- १२१.२ मिलीमीटर
सुधागड- १३८.० मिलीमीटर
अलिबाग – १८५.० मिलीमीटर
मुरुड – १९९.० मिलीमीटर