मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईची पुरती दैना केली. पाणी तुंबणार नाही, शहर थांबणार नाही हे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचे दावे हंगामातील पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेले. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे कोलमडली तर शहरातील अनेक भागही जलमय झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे गैरव्यवस्थांच्या तडाख्यातून मुंबई वाचली होती. मात्र सोमवारच्या पावसाने पहिले पाढे पंचावन्न असल्याचा अनुभव मुंबईकरांना दिला. मुंबई व उपनगरांत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. भरतीमुळे पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी दिवस उजाडण्यापूर्वीच शहराचे दळणवळण पुरते कोलमडले होते. काही रस्ते बंद करण्याची वेळ आली. रेल्वे प्रशासनाचे पितळही सोमवारच्या पावसाने उघडे पाडले. मध्य रेल्वेच्या अनेक लोकल गाड्या खोळंबल्याने नोकरदार वर्गाचे अतोनात हाल झाले. नवी मुंबई आणि मुंबई शहराला जोडणारा हार्बर मार्गही चुनाभट्टी भागात पाणी भरल्यामुळे ठप्प झाला. वडाळा येथील पंप बंद पडल्याने पाण्याचा उपसा होण्याचे काम थांबले. शेकडो लोकल फेऱ्या, नऊ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर ५०हून अधिक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलले. यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र संताप आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराने आठवड्याची सुरूवात; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे ७०० ते ८०० लोकल फेऱ्या रद्द

रविवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाचा जोर सकाळी ७ च्या सुमारास कमी झाला. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. दुपारनंतर दक्षिण मुंबईत पावसाने जोर धरला. तर रात्री शहर आणि उपनगरांत दमदार सरींनी पुन्हा हजेरी लावली. सोमवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी १०१.८ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात १४.१ मिमी पावसाची नोंद झाली.

सायंकाळच्या पावसामुळे वडाळा येथे पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा रात्री १०.१५ वाजेपासून अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच येथे रात्री १० च्या सुमारास पॉईंट बिघाड झाल्याने, लोकल सेवा विस्कळीत झाली. अप दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर परिणाम झाल्याने, जलद लोकल आणि दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबल्या होत्या.

पाणी रामेश्वरी, पंप सोमेश्वरी

●रुळांवर पाणी भरल्यास पॉइंट मशीनमधील बिघाड टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगितले गेले होते. २३१ ठिकाणी ही उपाययोजना केल्याचाही दावा करण्यात आला होता.

●मात्र, भांडूप आणि नाहूरदरम्यान ही उपाययोजना केली नव्हती आणि सोमवारी त्याच ठिकाणी पाणी साचून रेल्वे सेवा कोलमडल्याचे सूत्रांनी सांगितले.

●नेहमी पाणी साचणाऱ्या कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान मायक्रो टनेलिंग, उच्च क्षमतेचे पंप आदी उपाययोजना केल्या जातात. मात्र यंदाही या भागात पाणी साचल्याचे दिसले.

सहा तासांतील मुसळधार

प्रतिक्षा नगर – २२०.२ मिमी

शिवडी कोळीवाडा – १८५.८ मिमी

रावळी कॅम्प – १७६.३ मिमी

धारावी – १६५.८ मिमी

नाडकर्णी पार्क – १५६.६ मिमी

मालपा डोंगरी – २९२.२ मिमी

चकाला – २७८.२ मिमी

आरे कॉलनी – २५९ मिमी

एच.बी.टी शाळा – २५५ मिमी

नारियल वाडी – २४१.६ मिमी

वीर सावरकर मार्ग – ३१५.६ मिमी

पवई – ३१४.६ मिमी

कलेक्टर कॉलनी – २२१.२ मिमी

(रविवारी मध्यरात्री १ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंतची आकडेवारी)

मंगळवारी अतिमुसळधार?

मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर , सोलापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall disrupts normal life in mumbai zws
Show comments