मुंबईमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांकडे मात्र पाठ फिरविली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तलावक्षेत्रांत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे बुधवारी एका दिवसात तलावांमध्ये दहा दिवसांच्या पाणीसाठय़ाची भर पडली आहे. तसेच पावसाने जोर धरल्याने पाण्याचा उपयुक्त साठा संपुष्टात आलेल्या मध्य वैतरणामध्ये तब्बल ७,४९६ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे.
मुंबईत पावसाने जोर धरल्यामुळे तुळशी आणि विहारमधील साठय़ांत लक्षणीय भर पडली आहे. मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा धरणांकडे पावसाने पाठ फिरविली होती. मात्र गेले दोन दिवस या तलावक्षेत्रांमध्येही मुसळधार पाऊस पडू लागला आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एका दिवसात ३४,२५९ दशलक्ष लिटर पाण्याची तलावांमध्ये भर पडली आणि जलसाठा १ लाख ४५ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. दहा दिवसांच्या पाणीसाठय़ाची एका दिवसात धरणात भर पडल्याने पालिका अधिकाऱ्यांचे चेहरेही उजळले आहेत.
दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या घाटमाथ्यांवर गेले चार-पाच दिवस दमदार पाऊस पडल्यामुळे राज्यातील धरणांच्या साठय़ातही काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे विशेषत: कोकण आणि पुणे विभागाला थोडा दिलासा मिळाला आहे.