मुंबई परिसराला सोमवारी, सलग दुसऱ्या दिवशी संततधार पावसाने चिंब केले. मात्र, हा रिमझिम पाऊसही मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पेलू शकली नाही. शहर व उपनगरात ६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. येत्या २४ तासांत शहर व उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. पावसाने संततधार धरली असली तरी पावसाचा वेग कमी होता. तरीही शहरात सहा ठिकाणी, पूर्व उपनगरात २० ठिकाणी तर पश्चिम उपनगरात ३५ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या. या रिमझिम पावसात हिंदमाता, भायखळय़ाचा परिसर पाण्याखाली गेला. या भागात रस्त्यावर जवळपास फूटभर पाणी जमा झाल्याने उपनगरे आणि मुंबईला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा बोऱ्या वाजला आणि स्थानिक रहिवाशांचेही खूप हाल झाले.
मुक्तमार्गाचे उद्घाटन झाले असते तर..
दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला साडे सोळा किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचा साडेतेरा किलोमीटरचा लांबीचा टप्पा पावसाळय़ाच्या तोंडावर मे महिन्याच्या अखेरीस खुला होण्याचा मुहूर्त जानेवारीत जाहीर झाला खरा पण हायकमांडला खूष करण्यासाठी प्रकल्पाचे उद्घाटन काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या हस्ते करण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अट्टहास आहे. हा प्रकल्प ठरल्या मुहूर्तावर सुरू झाला असता तर सोमवारी पाणी तुंबल्याने रखडलेली मुंबईतील वाहतूक सुरळीत राहिली असती.
इमारत कोसळून एक ठार
पावसाळय़ाच्या पहिल्याच फेरीत माहीमच्या छोटा दर्गा भागातील अल्ताफ मॅन्शन या इमारतीचा एक भाग सोमवारी रात्री कोसळला. यात एक वृद्ध महिला ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण सापडले असण्याची भीती असून रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. माहीममधील अल्ताफ मॅन्शन ही इमारत जवळपास ४० वर्षे जुनी आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसानंतर सोमवारी रात्री या इमारतीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. यात जैबुन्निसा अब्दुल सत्तार लाखा (७६) ही वृद्ध महिला ठार झाली. तर चार जण जखमी झाले असून दोघांना वांद्रय़ातील भाभा रुग्णालय, तर एक केईएम रुग्णालयात व एकास शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.