अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील ३५८ पैकी १६८ तालुक्यांना फटका बसला असून, यात २६ जण दगावले आहेत. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार १२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
गारपीटग्रस्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. मराठवाडय़ात सर्वाधिक सहा लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. विदर्भात दोन लाख हेक्टर शेतीक्षेत्राचे, नाशिक विभागात १ लाख ३३ हजार हेक्टर शेतीचे तर पुणे विभागात सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिली.
पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात आतापर्यंत २६ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक १५ हे मराठवाडय़ातील आहेत. गारपिटीमुळे २८३ जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजारांच्या आसपास गुरे दगावली आहेत. १३ हजारांपेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे.
पावसाळ्यापेक्षा जास्त पाऊस!
सोलापूर : एरव्ही दुष्काळी पट्टय़ात मोजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पावसाळ्यात एकूण जेवढा पाऊस पडतो, त्याच्या निम्म्याहून अधिक पाऊस गेल्या १३ दिवसांत अवकाळी स्वरूपात वादळी वारे व गारपिटीसह पडला. मागील वर्षी संपूर्ण पावसाळ्यात जिल्ह्य़ात एकूण पाच हजार ५०४ मिली मीटर इतका पाऊस पडला होता. मात्र गेल्या १३ दिवसात अवकाळी पाऊस प्रचंड प्रमाणात म्हणजे तीन हजार ८९० मिली मीटर एवढय़ा प्रमाणात पडला. गेल्या २४ तासात ४१० मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

Story img Loader