उन्हाच्या झळांनी कावून गेलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या वळिवाच्या सरींनी मनसोक्त आनंद दिला. पावसाच्या या दमदार रंगीत तालिमीमुळे प्रत्यक्ष मान्सूनची सलामीही जोमदार असेल, या विचाराने मान्सूनच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झाला आहे. मान्सूनने शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांत प्रवेश केला असून तो येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाचा आणखी भाग व्यापून विदर्भातही प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
असह्य़ उकाडा, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, हवेतील कुंदपणा याने गेले काही दिवस मुंबईकर कावला आहे. अर्थात ही सारी ‘डार्लिंग मान्सून’ उंबरठय़ावर आल्याची लक्षणे असल्याचे जाणवून तो सुखावलाही आहे. गेल्या वर्षी रागावलेला वरुणराजा यंदा पूर्ण कृपावर्षांव करणार, असे भाकित पंचागकर्त्यांपासून देशी आणि विदेशी वेधशाळांनीही वर्तविले होते. या साऱ्यांचे अंदाज खरे ठरणार, अशीच जणू घोषणा करत मुसळधार सरी कोसळू लागल्या आणि (बहुधा जाणूनबुजून) घरी छत्री विसरलेल्या मुंबईकरांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मनमुराद उपभोगला.
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे ३२ मिमी तर सांताक्रूझ येथे ६.४ मिमी पावसाची नोंद झाल्याचे पालिकेच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
पुढील २४ तासामध्ये मुंबईचे हवामान ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.