मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकल सेवेवर झाला आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक अशा दोहोंवर पावसाचा परिणाम झाला आहे. पहाटे भांडुप, विक्रोळी स्टेशन या ठिकाणी पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरीचा मिलन सब-वे तसंच वरळीतल्या सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साठलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वेनेही मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याचं स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून डाऊन मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या लोकल तसंच एक्स्प्रेस गाड्या आणि एलटीटीहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. यासंदर्भातली पोस्ट केली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर यांना पावसाचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना आज ऑफिस गाठताना हाल सहन करावे लागणार हेच पावसाची स्थिती सांगते आहे.

या ट्रेन्स करण्यात आल्या रद्द

पुणे सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन
पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

सखल भागांमध्ये पाणी साठलं

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.

शनिवारपासून राज्यात वाढला पावसाचा जोर

शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला.

ट्रान्स हार्बरची वाहतूकही उशिराने

मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. तसेच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक देखील सध्या ठप्प झाली आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणाम झालेला नाही.

मुंबई महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.

आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल