मुंबई : मुंबईत गुरुवारी सलग चौथ्या दिवशी पाऊस पडला. मात्र गुरुवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३३ मिमी तर सांताक्रूझ केंद्राने १३ मिमी पावसाची नोंद केली. गेले चार दिवस मुंबईत चांगला पाऊस पडल्यामुळे पावसाचे सरासरी प्रमाण वाढले आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३६.३७ टक्के पाऊस झाला आहे.

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून दर दिवशी शंभर ते दीडशे मिमी पाऊस पडतो आहे. गुरुवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत कुलाबा येथे ११० मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता व ५० मिमीपेक्षाही कमी पाऊस पडला. कुलाबा हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने पुढील २४ तासांकरिता शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसभरात मुंबईत एकूण ४५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या, तर ४४ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे आल्या. १५ ठिकाणी घर व भिंतीचा भाग पडल्याच्या तक्रारी आल्या.

Story img Loader