मुंबई : दरम्यान, मुंबईत शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर गुरुवारपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. उपनगरातील बोरिवली, गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे, तर शहरातील दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईत गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यमापक केंद्रावर गुरुवारी सकाळी ८:३० ते शुक्रवारी सकाळी ८:३० पर्यंत झालेल्या नोंदीनुसार मुंबई शहरात ६६.५३ मिमी, पूर्व उपनगरात ७९.६५ मिमी, पश्चिम उपनगरात ५९.४२ मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा…समभागांच्या गुंतवणुकीवरील नफ्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक, आरोपीला अटक
महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, पालघर, ठाणे आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
नवी मुंबईतही संततधार
नवी मुंबईत गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून शुक्रवारीही शहरात पाऊस कायम आहे. वाशी, कामोठे, खारघर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.
हेही वाचा…हिवताप आणि डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण, दोन वर्षांत रुग्णसंख्येत मोठी वाढ
नवी दिल्लीतही मुसळधार पाऊस
नवी दिल्लीत गुरुवारी पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत नवी दिल्लीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच दिल्ली विमानतळावरील टर्मिनल १ परिसरातील छत कोसळून टॅक्सीचालकाचा मृत्यू झाला.