रविवारपासून उधाणलेल्या पावसाने सोमवारीही विश्रांती न घेता मुंबईकरांवर कृपा‘वृष्टी’ सुरूच ठेवली. त्यामुळे सोमवारी सकाळी कामावर जायला निघालेले मुंबईकर ठिकठिकाणी अडकून पडले. सोमवारी पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडत शहराची दैना उडवली. मध्य रेल्वेने नेहमीप्रमाणे मान टाकली तर रस्त्यावरील खड्डय़ांनी डोके वर काढले. नालेसफाईचा पालिकेचा दावा तर रविवारीच फोल ठरला होता. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचेही दृष्य होते.
६१ ठिकाणे
या पावसात शहर व उपनगरात ६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. सांडपाणी वाहून नेणाऱ्या रस्त्याखालच्या मोठय़ा वाहिनीच्या दुरुस्तीसाठी लावण्यात आलेले मोठमोठे पडदे कंत्राटदाराने तसेच ठेवल्याने पाण्याची वाट अडून सोमवारी हिंदमाता, भायखळय़ाचा परिसर पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीचा बोऱ्या वाजला आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी या प्रकाराची चौकशी व दोषींवर कारवाईचे आदेश दिले असले तरी बेपर्वा कंत्राटदार आणि उदासीन अधिकाऱ्यांनी मुंबई वेठीस धरल्याचे चित्र समोर आले आहे.
वाहतुकीचा बोऱ्या
शहर व उपनगरात सोमवार पहाटेपासून पावसाने संततधार धरली असली तरी पावसाचा वेग कमी होता. शहरात सहा ठिकाणी, पूर्व उपनगरात २० ठिकाणी तर पश्चिम उपनगरात ३५ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या. या रिमझिम पावसात हिंदमाता, भायखळय़ाचा परिसर पाण्याखाली गेला. या भागात रस्त्यावर जवळपास फूटभर पाणी जमा झाल्याने उपनगरे आणि मुंबईला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा बोऱ्या वाजला आणि स्थानिक रहिवाशांचेही खूप हाल झाले. दिवसभरात झाडे पडण्याच्या २५ घटना तर घर वा भिंत पडण्याच्या सहा घटना घडल्या. तर घाटकोपर, वडाळा आणि घोडपदेव या तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
सुटीवार..
मुंबई उपनगरापासून थेट कल्याणपर्यंतच्या नोकरदारांची यंदाच्या पावसातील पहिली सुटी सोमवारी झाली. सिग्नल यंत्रणा पावसाळ्यात बिघडणे हे मध्य रेल्वेच्या पाचवीला पुजले आहेच पण यंदा पावसाळ्यात रेल्वे स्थानकासह मार्ग पाण्याखाली जाण्याचे प्रसंग मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पाहण्यास मिळाले आहेत.
सोमवारी सकाळपासूनच पावसाने दाखविलेल्या हिसक्याने मध्य रेल्वे सकाळी नऊपर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान ठप्प झाली होती. कोकण कन्या एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडणे, सिग्नल यंत्रणा बिघडणे आणि पाणी साठणे या कारणामुळे सोमवारी सकाळी मध्य रेल्वेचा पार बोजवारा उडाला होता. दिवसभरात मध्य रेल्वेच्या तब्बल ११७ फेऱ्या रद्द झाल्या, दोन लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळा बदलल्या तर सहा मेल एक्स्प्रेस गाडय़ा विलंबाने धावत होत्या. पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होत्या तथापि त्यांच्या कोणत्याही फेऱ्या रद्द झाल्या नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
महाराष्ट्रव्यापी..
दरम्यान, नैर्ऋत्य मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आणि त्याने पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावामुळे मुख्यत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. पुढाल दोन दिवसांतही पाऊस सक्रिया राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. मुंबईत कुलाबा येथे सोमवारी सायंकाळपर्यंत ५८ मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडला.
कोकणात संततधार
गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या मान्सून पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये अजून सुरूच असून, खेड तालुक्यात डोंगराला भेगा पडल्यामुळे ६५ घरांना धोका निर्माण झाला आहे.

Story img Loader