मुंबई : ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यांत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
ठाणे, पालघर भागात गुरुवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली. या भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. काही भागात पाणी साचले असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच या भागांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा नव्याने जारी केला आहे. तसेच कल्याण, डोंबिवली या परिसरात पहाटेपासून सर्वात जास्त पाऊस झाला.
मुंबई आणि उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी, मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबई आणि उपनगरांत बुधवारपासून पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.