ऑगस्ट महिन्यात काही काळ दडी मारून बसलेल्या पावसाने गणेशोत्सवात चांगलीच हजेरी लावली. शनिवारपासून कोकणात सुरू झालेल्या पावसाने रविवारी मुंबईसह राज्यातील इतर भागातही हजेरी लावली. सोमवारीही पावसाचा जोर कायम राहिला असून पुढील ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
नैऋत्य मोसमी वारे, विदर्भात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेकडून केरळच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे मुंबई विभागीय हवामान केंद्राचे महासंचालक व्ही. के. राजीव यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहील, असा अंदाजही वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात
आला आहे.
 सकाळी ८.०० पर्यंतच्या आकडेवारीनुसार कुलाबा येथे २४ तासांमध्ये ६०.१ मिमी पाऊस पडला तर सांताक्रूझ येथे ११५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसामुळे मुंबईत विविध ठिकाणी पाणी भरले होते. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. दादर, परळ, शीव, कुर्ला, घाटकोपर आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साठले होते. तर पूर्व द्रुतगती मार्गावरही पाणी साठल्यामुळे मुलुंडजवळ काहीकाळ वाहतूक धीम्या गतीने सुरू होती, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
पाण्याचा मुबलक साठा
मध्य वैतरणा प्रथमच पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्याने तलावांमध्ये पाणी साठवण्याच्या क्षमतेत सुमारे दोन लाख दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत साडेतेरा लाख दशलक्ष लिटर पाणीक्षमता असलेल्या तलावांमध्ये यावेळी १ सप्टेंबरपर्यंत १३ लाख ९७ हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अप्पर वैतरणा तलावही लवकरच भरून वाहू लागेल. अप्पर वैतरणा तलावात आतापर्यंत २ लाख १० हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा