मुंबई – जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावर मेट्रोचे गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्याने मंगळवारी सकाळ पासून पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी पहाटे ६ च्या सुमारास हे काम पूर्ण झाले, मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत घाटकोपर छेडा नगर परिसरात वाहनानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावर मेट्रोचे गर्डर बसिवण्याचे काम रखडले होते. या रस्त्यावरील वाहतूक अंशत: बंद करून सोमवारी रात्री हे काम सुरू करण्यात आले होते.
मंगळवारी सकाळी ६ वाजता काम पूर्ण करण्यात आले. मात्र दुपारपर्यंत अनेक मोठ्या क्रेन रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. परिणामी, पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर झाला. सकाळपासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुलुंडपासून घाटकोपरच्या छेडा नगरपर्यंत वाहतुकीला फटका बसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पूर्व द्रुतगती मार्गावरून चैत्यभूमीवर जाण्यासाठी निघाले होते. त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अनेक वाहनचालकांनी एलबीएस मार्गावरून जाणे पसंत केले. परिणामी या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे.