मुंबई: ठाणे-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची अत्याधुनिक ( रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी) तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने रस्ते दुरुस्ती करावी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच ठाणे, पालघर, नाशिक व रायगड जिल्ह्यात सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री उद्या (शुक्रवारी) ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी करणार आहेत. ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. त्यावेळी शिंदे यांनी खड्डे बुजविणे आणि रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सक्त सूचना दिल्या. दरम्यान, रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ याच वेळात अवजड वाहनांना वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिका आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी

नाशिक- भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याची गंभीर दखल घेत दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. तसेच नवी मुंबई, पनवेल, जेएनपीटी भागातून येणाऱ्या वाहतुकीच्या नियमनासाठी सिडकोने नवी मुंबई पोलिसांना २०० वाहतूक नियंत्रक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. तसेच अवजड वाहनांसाठी आवश्यक तेवढ्या क्रेन जेएनपीटीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

तात्काळ खड्डे बुजवा

ठाणे ते नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवसरात्र एक करून खड्डे बुजवावेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. खड्डे बुजवताना रॅपीड क्वीक सेटींग हार्डनर, एम सिक्टी या साहित्याच्या वापर करावा. तात्काळ खड्डे बुजविल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicle restriction on nashik ahmedabad highway cm eknath shinde order zws