मुंबई : विविध तेल आणि गॅस कंपन्यांमुळे चेंबूर परिसरात दिवसरात्र अजवड वाहनांची ये-जा सुरू असून याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे शाळेत जाण्या-येण्याच्या वेळेत चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोडी होत आहे. परिणामी, या भागातील शाळांच्या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : संजय राऊत यांचा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज
चेंबूरच्या माहुल गाव परिसरात अनेक तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. दिवस-रात्र सुरू असणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. चेंबूर नाका, चेंबूर कॉलनी, गोल्फ क्लब, आशिष सिनेमा, वाशी नाका या परिसरातून ही वाहने जात-येत असतात. याच मार्गावर, महात्मा हायस्कुल, चेंबूर हायस्कुल, नॅशनल हायस्कुल, साधू वासवाणी हायस्कुल, सनातन हायस्कुल, मरवली चर्च येथील मुंबई पब्लिक स्कुल, सेंट सबर्स्टन स्कुल आदी शाळा, तसेच अनेक बालवाडी आणि नर्सरी स्कुलही आहेत.
अवजड वाहनांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरच्या आरसी मार्ग आणि सीजी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारी बारा ते दुपारी दोन या दरम्यान या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी विद्यार्थ्यांना या कोंडीतून बाहेर पडताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अवजड वाहनांच्या कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शाळेच्या वेळेत पोलिसांनी या मार्गावरील अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस चेंबूर परिसरात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिकाही अडकत आहेत. अनेक रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले आहेत, असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.