मुंबई : शरीराची उंची आणि वजन हे समीकरण ठरलेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे एखाद्या व्यक्तीचा लठ्ठपणा कमी करायचा असल्यास हे समीकरण लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागतो. मात्र यापुढे शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणा कमी करताना संबंधित व्यक्तीला असलेले मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे अन्य आजारही विचारात घ्यावेत, असा निष्कर्ष देशातील काही डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईसह देशातील बॅरिॲट्रिक तज्ज्ञांनी एकत्र येऊन देशातील लठ्ठ व्यक्तींचे एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये लठ्ठपणाने ग्रस्त १ हजार ४६ रुग्णांवर संशोधन करण्यात आले. हे सर्वेक्षण नुकतेच ‘डायबिटीज ॲण्ड ओबॅसिटी इंटरनॅशनल’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मुंबईमधील डॉ. अपर्णा गोविल भास्कर, नवी दिल्लीतील डॉ. अतुल एन. सी. पीटर्स, जालंधरमधील डॉ. जी. एस. जम्मू, अहमदाबादमधील डॉ. मनीष खेतान, चेन्नईतील डॉ. राज पलानीप्पन, पुण्यातील डॉ. शशांक शाह, बेंगळुरूमधील डॉ. शिवराम एच.व्ही. आणि कोईम्बतूरमधील डॉ. प्रवीण राज हे या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.

हेही वाचा – मंत्रालयातील बैठकीला ‘एमपीएससी’ उत्तीर्ण अभियंत्यांना निमंत्रणच नाही, वर्षभर नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेनंतर आझाद मैदानात अभियंत्यांचे बेमुदत उपोषण सुरू

लठ्ठपणामुळे हृदय रोग, टाइप २ मधुमेह, कर्करोग, स्लीप एपनिया, वंधत्व, यांसह अन्य समस्यांचा धोका वाढतो. देशातील डॉक्टरांनी केलेल्या या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या एक हजार ४६ जणांमध्ये ६३९ महिला आणि ४०७ पुरुषांचा समावेश होता. हे सर्वेक्षण १५ ते ९७ वर्ष वयोगटातील व्यक्तींमध्ये करण्यात आले. त्यातील ६६.६३ रुग्णांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासली आहे. त्याचबरोबर ६.९ टक्के लोकांचा लठ्ठपणा संतुलित आहार व व्यायामाद्वारे, तसेच ४.६ टक्के रुग्णांचा फार्माकोथेरपीद्वारे लठ्ठपणा कमी होऊ शकतो, असे निदर्शनास आले. लठ्ठपणाचे मूल्यांकन करताना फक्त वजन आणि बॉडी मास इंडेक्सबरोबरच (बीएमआय) वय, शारीरिक क्षमता, अन्य आजार, मानसिक आराेग्य, अनुवांशिक घटकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचे डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाने २०१९ ते २०२१ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानुसार १५ ते ४९ वयोगटातील ६.४ टक्के महिला आणि ४ टक्के पुरुष लठ्ठपाणाने ग्रस्त आहेत. तर पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये ९.४ टक्क्यांपर्यंत लठ्ठपणा आढळून आला. तसेच २०४० पर्यंत पुरुषांमधील लठ्ठपणाचे प्रमाण ९.५ टक्क्यांवर, तर महिलांमध्ये १३.९ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – झोपडपट्टी पुनर्वसनातील बहुसंख्य इमारती धोक्याच्या उंबरठ्यावर, प्राधिकरणाकडून पुन्हा नव्याने सूचना जारी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अन्य पर्याय

संतुलित आहार आणि औषधांच्या माध्यमातून लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो. लठ्ठपणाला यापैकी दोनपेक्षा अधिक घटक कारणीभूत असल्यास संबंधित व्यक्तीला शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Height weight and other factors are also important for obesity surgery the conclusion of expert doctors in the country mumbai print news ssb
Show comments