मुंबई : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना रुग्णालयापर्यंत पाेहचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी १०८ रुग्णवाहिका नागरिकांसाठी वरदान ठरली आहे. या रुग्णवाहिकेची सेवा अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुढील वर्षात ‘१०८ हवाई रुग्णवाहिका सेवा’ सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत विमानचालन विभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत राज्यात ऑक्टोबरपर्यंत अत्याधुनिक, अद्ययावत १०८ रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. त्यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशु रुग्णवाहिका, फर्स्ट रेस्पॉन्डर बाईक्स, समुद्री नौका आणि नदीतील नौका यांचा रुग्णवाहिका म्हणून समावेश करण्यात येणार आहे. मात्र त्याचबरोबर दरड कोसळणे, पूरस्थिती निर्माण होणे अशा प्रसंगी जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवा’ (एमईएमएस) प्रकल्पांतर्गत सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया, एसएसजी ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो एसएल, स्पेन आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यासोबत करार केला आहे. या करारांतर्गत चार हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. हे हेलिकॉप्टर राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येईल. तेथून अत्यावश्यक ठिकाणी हेलिकॉप्टर अत्यल्प वेळात पोहचणे शक्य होईल. हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेच्या सेवेचा वापर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतील.

हे ही वाचा… मुंबई : म्हाडा बनावट संकेतस्थळ प्रकरणी दोघांना अटक

हे ही वाचा… अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कल यंदा कोणत्या शाखेकडे?

हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेमुळे हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये हृदय ठराविक कालावधीत रुग्णालयात पोहचवणे शक्य होणार आहे. दरड कोसळलेल्या भागातील जखमींना किंवा पूरग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहचवणे शक्य होणार आहे. हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी वर्षाभरात परवानगीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे पुढील वर्षामध्ये १०८ रुग्णवाहिकेची हेलिकॉप्टर सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सुमित ग्रुप एंटरप्राइजचे उपाध्यक्ष सुमित साळुंके यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helicopter ambulance service on emergency 108 number soon in state mumbai print news asj