प्रेमभंगामुळे नैराश्य आलेल्यांचा समुपदेशनाकडे ओढा

दिशा खातू, मुंबई</strong>

जगभरातील प्रेमी युगुले जोडीदारासमवेत ‘व्हॅलेंटाइन डे’चा आनंद साजरा करत असतानाच समुपदेशन सेवा देणाऱ्या संस्थांचे दूरध्वनी क्रमांकही गुरुवारी दिवसभर खणखणत होते. अपेक्षित जोडीदार न मिळाल्याने किंवा प्रेमभंगामुळे निराशा पदरी आलेले तरुण-तरुणी या हेल्पलाइनवर दूरध्वनी करून आपली मने मोकळी करत होते. आपल्या आजूबाजूला साजऱ्या होणाऱ्या प्रेमदिनी या तरुणवर्गातील एकटेपणाची जाणीव त्यांना आणखी निराश करत असून त्यातूनच सावरण्यासाठी ही मंडळी हेल्पलाइनचा आधार घेत असल्याची माहिती या संस्थांनी दिली.

‘तरुणवर्गात प्रेमदिन ‘सप्ताहा’चे आकर्षण अधिक आहे; परंतु प्रेमाच्या दिवसाचे साजरीकरण होत असताना आपल्यासोबत कुणीच नाही, यामुळे प्रेमभंग झाला नसला तरी अनेक जण दु:खीकष्टी होतात.

अशा या निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांच्या दु:खाला समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाइनवर वाट करून दिली जाते. या दिवसाच्या आगेमागे अशा नैराश्यग्रस्तांचे फोन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात

वेगवेगळ्या कारणांसाठी येणाऱ्या १०० कॉलपैकी १५ ते २० कॉल हे प्रेमभंग अथवा प्रेमभावनेशी निगडित समस्यांचे असतात, असे ‘बी बेटर’ संस्थेच्या माहिती विश्लेषण विभागाच्या प्रमुख संयोगिनी त्रिवेदी यांनी सांगितले. संपर्क साधणाऱ्यांचा वयोगट १४ ते ४० वर्षे इतका असतो. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण ३ ते ४ कॉल्स इतके मर्यादित होते, असेही त्यांनी सांगितले.

अनेकदा समुपदेशन इच्छिणाऱ्यांच्या समस्या किरकोळ असतात. मला कुणी प्रेयसीच मिळत नाही इथपासून ते माझ्याकडे कुणी मुलगाच कधी बघत नाही, असे प्रश्न ही मंडळी मांडतात. ‘रात्री एकटे वाटते’, ‘व्हॅलेंटाइन डेला प्रचंड नैराश्य येते’, ‘माझ्यासोबत वेळ घालवायला कुणीच नाही’ अशा स्वरूपाच्या या तक्रारी असतात. ‘माझा प्रेमभंग झाला आहे.

व्हॅलेंटाइन डेला ‘त्या’ आठवणी सतावतात. मला त्या विसरायच्या आहेत. काय करू?’ असे प्रश्नही समुपदेशकांना विचारण्यात येतात. काही जणांना एकटेपणा इतका छळत असतो की, ते समुपदेशकांनाच भेटण्याची विनंती करतात, असे मानसोपचारतज्ज्ञ आणि ‘बी बेटर’च्या प्रमुख कार्यवाह सुनीता प्रभुणे-कोचर यांनी सांगितले.

इतके नैराश्य का?

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी जोडीदार नसण्याचे दु:ख इतके नैराश्य कसे आणते, याबद्दल विचारणा केली असता, ‘ब्लिसफुल माइंड थेरेपी सेंटर’च्या नीता व्ही. शेट्टी म्हणाल्या, ‘‘विभक्त कुटुंबपद्धती, नोकरदार पालक यामुळे मुलामुलींना वडीलधाऱ्यांचा जास्त सहवास मिळत नाही. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये आजी-आजोबा, काका-काकू, मोठी भावंडे यांच्या माध्यमातून मुलांचे घरीच समुपदेशन होत असे. त्यातच शिक्षणाचा ताण, करिअरचे आव्हान यामुळे तरुणवर्गावरील दबाव वाढला आहे. समाजमाध्यमांच्या आभासी जगाकडे पाहताना स्वत:मध्ये त्रुटी असल्याची जाणीव प्रखर होत राहते. या साऱ्यांमुळे जोडीदाराची गरज प्रकर्षांने जाणवू लागते व तो/ती नसल्यास नैराश्य वाढते.’

Story img Loader