लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मुंबई : लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीतून किंवा लोकलमधून प्रवास करताना मोबाइल चोरीला गेला किंवा हरवल्यास गोंधळून न जाता तात्काळ मदतवाहिनी क्रमांक १३९ वर संपर्क साधून तक्रार करावी. यासंदर्भात सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करण्यात आला आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानके, रेल्वेच्या हद्दीतून मोबाइल हरवल्याची वा चोरीला गेल्याची तक्रार दररोज सुमारे ५ ते १० प्रवासी रेल्वे पोलिसांकडे करतात. परंतु, रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अनेक जण तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. प्रवाशांना गुन्हा दाखल करायचा नसेल, तर त्यांना सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

तसेच हरवलेला मोबाइल परत मिळवण्यासाठी, प्रवासी रेल मदत किंवा १३९ क्रमांकाशी संपर्क साधून संबंधितांना तक्रार करता येते. जर प्रवाशांनी सीईआयआर पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय निवडल्यास आरपीएफचा विभागीय सायबर सेल सीईआयआर पोर्टलवर तक्रार नोंदवेल आणि आवश्यक तपशील प्रवीष्ट केल्यानंतर डिव्हाइस ब्लॉक करेल.

भारतीय रेल्वेने प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल परत मिळवण्यास मदत करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. दूरसंचार विभागासोबत (डीओटी) भागिदारीत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) एक प्रणाली सुरू केली आहे. प्रवाशांना रेल मदत किंवा १३९ क्रमांकाशी संपर्क साधून हरवलेल्या क्रमांकाची तक्रार करता येते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हरवलेल्या मोबाइलमध्ये कोणी नवीन सिम कार्ड टाकल्यास, मोबाइल वापरणाऱ्याला तो जवळच्या आरपीएफ कार्यालयात परत करण्याचे आवाहन केले जाईल. परंतु, याचे पालन न केल्यास, आरपीएफ एफआयआर दाखल करू शकते आणि हे प्रकरण जिल्हा पोलिसांकडे पाठवू शकते. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे दाखवून संबंधितांना त्यांचा मोबाइल परत केला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीईआयआर पोर्टल हे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल ब्लॉक करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी तयार केलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आरपीएफ आता हरवलेले मोबाइल परत मिळविण्यासाठी आणि बेकायदेशीर ताबा आणि विक्री रोखण्यासाठी या पोर्टलचा वापर करणार आहे.

ईशान्य सीमावर्ती रेल्वेमध्ये (एनएफआर) मे २०२४ मध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर तो देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे हरवलेले अनेक मोबाइल मिळविण्यात आले आणि मोबाइल चोरीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helpline number for lost mobile phone during train journey mumbai print news mrj