चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी या कांदिवलीतील दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या चिंतननेच हेमाला कांदिवलीला गोदामामध्ये बोलावून घेण्यास विद्याधर राजभर याला सांगितले होते, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. फरारी असलेल्या विद्याधरच्या एका कर्मचाऱ्यानेच चिंतनचा नोकर असल्याचे भासवून हेमाला फोन केला होता, असेही आता चौकशीत स्पष्ट झाले आहे.
चिंतनविरुद्ध काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला न्यायालयीन लढाईत फायदा होईल, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने हेमाला सांगितले होते. आपण चिंतनच्या जयपूर येथील घरी नोकरकाम करतो, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. नोव्हेंबरमध्येही या संदर्भात फोन करण्यात आला होता. हेमाने त्याला दादर येथे भेटण्यास बोलाविले होते; परंतु ती जागा सुरक्षित नसल्यामुळे विद्याधरच्या गोदामात भेटणे योग्य असल्याचे हेमाला सांगण्यात आले. चिंतनविरुद्धचे पुरावे आपल्याला उपयोगी पडतील, असे वाटल्यामुळेच हेमाने वकील भंबानी यांना सोबत घेतले, अशी माहितीही आता उघड होत आहे. चिंतन आणि विद्याधर यांनी वेळोवेळी भेटून या हत्याकटाची आखणी दोन-तीन महिन्यांपासून केली होती, असा दावाही पोलिसांनी केला आहे. अज्ञातस्थळी त्यांच्या भेटी झाल्या आणि या भेटीतच या कटासाठी चिंतनने पैसे दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा