कलाकार हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंभानी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास हाती घेतलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेसत्र सुरू केले आहे. गुजरातच्या नवसारी भागात छापा मारून मुख्य आरोपी विद्याधर राजभर याचा गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला. परंतु, पाच ते सहा दिवस राहूनही त्याचा शोध न लागल्याने पोलिसांना परतावे लागले. गुन्हे शाखेने विद्याधर देशात कोणकोणत्या ठिकाणी लपलेला असू शकतो या ठिकाणांची यादीच तयार केली असून त्यानुसार छापेसत्राला सुरुवात केली आहे.

शिल्पकार हेमा उपाध्याय आणि तीचा वकील हरेश भंभानी यांची डिसेंबर २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपात हेमाचा पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. तसेच हेमाची हत्या करण्याचा आरोप असलेला विद्याधर राजभर याच्या कार्यशाळेतील तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. पण, हत्येच्या दिवसापासून बेपत्ता असलेला विद्याधर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मे महिन्यात पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखा कक्ष ७ कडे सोपवला. कक्षाने विद्याधरविषयी माहिती घेऊन त्याने भारतात कोणकोणत्या ठिकाणी काम केले आहे, आणि याआधी करण्यात आलेल्या तपासात विद्याधरचा कुठे ठावठिकाणा होता, याची माहिती जमा केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी भारतातील विविध ठिकाणांची एक यादीच तयार केली असून त्यातल्या पहिल्या ठिकाणी पोलिसांनी नुकताच छापा घातला. कक्ष ७ चे एक पथक गुजरातच्या नवसारी येथे गेले, विद्याधरचा हातखंडा असलेल्या इन्स्टॉलेशनच्या कारखान्यांवर लक्ष ठेवून त्याचा शोध घेतला. मात्र, हा शोध अपयशी ठरला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. कांदिवली पोलिसांनी विद्याधरचा शोध घेतला तेव्हा तो पूर्व भारतापासून दक्षिण भारतापर्यंत प्रवास करत असल्याचे आढळले. त्या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे समजते.