मुंबई: हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होत असली, तरी ठाणे सिव्हील रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्याने रुग्ण सर्वसामान्य जीवन जगत आहे. त्यामुळे हिमोफिलिया ग्रस्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून ठाणे जिल्हा रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची पाठ थोपटली आहे. त्याचवेळी देशभरातून हिमोफेलिया रुग्ण उपचारासाठी महाराष्ट्रात येत असल्यामुळे त्यांच्या खर्चाचा मोठा बोजा आरोग्य विभागावर येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुवांशिक आजारामध्ये गणना होणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांना वेळेत उपचार मिळणे खूप महत्वाचं असते. या आजारात रक्त गोठ्ण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे अनेकदा हिमोफिलिया व्यक्तीला जखम झाली अथवा अवयवावर अधिक ताण पडल्यावर रक्त थांबण्याचे नाव घेत नाही. त्यावेळी हिमोफिलिया रुग्णांना अधिक त्रास होतो. मात्र या दरम्यान हिमोफिलिया इंजेक्शन घेणं खूप महत्वाचे आहे. ही इंजेक्शन सर्वसामान्यांसाठी खर्चिक असली, तरी सिव्हील रुग्णालयात ही इंजेक्शन मोफत मिळत आहेत आणि वेळेवर उपलब्ध होत असल्याची माहिती हिमोफिलिया फेडरेशन दिल्लीचे उपाध्यक्ष रामू गडकर यांनी दिली. हिमोफिलिया ग्रस्त विद्यार्थ्यांना शारीरिक नोकऱ्या करता येत नसल्यामुळे त्यांना सुशिक्षित आणि चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा आहे. आणि वेळोवेळी ठाण्यातील सिव्हील रुग्णालय आम्हाला औषधोपचार आणि इंजेक्शन उपलब्ध होते. परीक्षेच्या काळात देखील आम्हाला वेळेत इंजेक्शन मिळाले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा – धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

हिमोफिलिया हा एक दुर्मिळ, अनुवांशिक रक्त विकार आहे. वेळच्यावेळी औषध घेणे गरजेचे आहे. काही वेळा रक्तस्त्राव वाढत असल्यास तात्काळ इंजेक्शन घेणे क्रमप्राप्त आहे. सिव्हील रुग्णालय ही इंजेक्शन तात्काळ कशी उपलब्ध होतील यासाठी अग्रक्रम दिला जातो. हिमोफिलियाग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षणातील हुशारी बघून कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात हिमोफिलियाचे साधारण ७०० ते ८०० रुग्ण आहेत. हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या रुग्णांना सिव्हील रुग्णालयात हिमोफिलिया इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. हिमोफिलिया ग्रस्त विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खूप मोठ आहे. ठाणे रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या १५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हिमोफेलिया केंद्र सुरु करण्यात आले असून सुमारे पाच हजार रुग्णांना हिमोफेलियाची इंजक्शन द्यावी लागतात. यासाठी सुमारे शंभर कोटीहून अधिक खर्च येत असून हा खर्च संपूर्णपणे आरोग्य विभागाकडून करण्यात येतो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातही हिमोफेलियाच्या रुग्णांना फॅक्टर आठ व नऊ तसेच फिबा आदी इंजिक्शन देण्यात येत असले तरी आर्थिक भार हा आरोग्यविभागावरच येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या रुग्णांवरील आर्थिक तरतूद मोठी असून काही ठराविक कंपन्याच या औषधांचे उत्पादन करत असून अलीकडच्या काळात यातील काही कंपन्यांनी औषधांची किंमत वाढविल्यामुळे आरोग्य विभागावर याचा मोठा आर्थिक बोजा पडत असून मुंबई महापालिकेनेही यासाठी येणार्या खर्चाचा भार उचलला पाहिजे असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाने हिमोफेलिया केंद्र सुरु केले असले तरी अनेकदा रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होतात असे हिफोफेलिया सोसायटी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. मात्र ठाणे जिल्हा रुग्णालयात अनेकदा गुजरातमधील रुग्णही उपचारासाठी येतात व त्यांनाही ही इंजक्शने उपलब्ध करून दिली जातात. देशातील अनेक राज्यात हिमोफेलियाच्या औषधांचा पुरेसा साठा नसल्याने वेगवेगळ्या राज्यातून महाराष्ट्रात रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे त्याचाही आर्थिक भार आरोग्य विभागाला सहन करावा लागतो असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – नेपाळी महिलेचा भारतीय पारपत्रावर तीनवेळा सिंगापूरला प्रवास, अखेर महिलेस मुंबई विमानतळावर अटक

भारतात आजघडीला हिमोफेलिया ऑफ इंडिया रजिस्ट्रीच्या नोंदीनुसार सुमारे ३० हजार हिमोफेलियाचे रुग्ण आहेत. तथापि अनेक राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात हिमॅटॉलॉजी विषय सक्षम नसल्याने बहुतेक राज्यातून रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी येतात.मात्र या रुग्णांना जी औषधे/ इंजेक्शन द्यावी लागतात त्याचा खर्च आरोग्य विभागाला करावा लागतो. यासाठी हिमोफेलिया सोसायटी ऑफ इंडियाने उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यातील आरोग्य व वैद्यकीय शिक्षण सचिवांशी संपर्क साधून संबंधित राज्यात या रुग्णांसाठी योग्य ती व्यवस्था करावी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. अलीकडेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांबरोबरही एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असले तरी अद्यापि ठोस निश्पत्ती निघाली नसल्याचे हिमोफेलिया सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली चॅप्टरचे रामू गडकरी यांनी सांगितले. आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संसदेतील खासदारांच्या माध्यमातून या विषयावर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemophilia patient treatment maharashtra hemophilia thane district hospital ssb