मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाविषयी जनजागृती करतानाच पुरातन वारसा वास्तूंचे दर्शन आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचे स्मरण करण्यासाठी ‘विलापार्ले (पूर्व) हेरिटेज वॉक’ या अनोख्या उपक्रमाचे मुंबई महानगरपालिका आणि शिलाहार हेरिटेज सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विलेपार्ले (पूर्व) परिसरातील दिग्गजांची निवासस्थाने, संस्थांना भेटी देण्यात येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पदयात्रा, घरोघरी भेटी, चौक सभा आदींच्या माध्यमातून प्रचार टीपेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांचे उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्याच वेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध यंत्रणा निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीपर उपक्रम राबवित आहेत. सायकल रॅली, पथनाट्य आदींच्या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. अंधेरी परिसरात नुकतीच सायकल रॅली आणि पथनाट्याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. आता मुंबई महानगरपालिकेने शिलाहार हेरिटेज सर्व्हिस या संस्थेच्या मदतीने ‘विलेपार्ले (पूर्व) हेरिटेज वॉक’चे आयोजन केले आहे. निमित्त ‘हेरिटेज वॉक’चे असले तरी यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मतदानाविषयी जनजागृती करणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ‘विलेपार्ले (पूर्व) हेरिटेज वॉक’ला सुरुवात होणार आहे. या ‘हेरिटेज वॉक’दरम्यान विलेपार्ले (पूर्व) परिसरातील १०० वर्षांहून अधिक जुन्या इमारती, लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे दालन आणि अन्य जुन्या संस्था, पार्ले टिळक विद्यालय, प्रसिद्ध पार्लेश्वर मंदिर, हनूमान मंदिर, दत्त मंदिर, प्रख्यात शिल्पकार रावबहादूर म्हात्रे यांच्यासह विलेपार्ले (पूर्व) परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची निवासस्थाने आदी ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत. या ‘हेरिटेज वॉक’मध्ये पुरातत्वशास्त्र तज्ज्ञ आणि लेखक संदीप दहिसरकर विलेपार्ले (पूर्व) परिसरातील पुरातन वारस्ता वास्त, पुरातन इमारती, मान्यवरांच्या वास्तू आदींची माहिती देणार आहेत.