विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचे मंगळवारी विधानपरिषदेत दिसून आले. सभागृहात कोणते कामकाज होणार आहे, याची माहिती गटनेते देत नाहीत, अशी तक्रार कदम यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यापुढेच सभागृहात केली.
सहकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबतचे विधेयक विधानपरिषदेत रात्री साडेदहापर्यंत कामकाज करून सोमवारी मंजूर करण्यात आले. महत्त्वाच्या विधेयकांवर अनेकांना चर्चा करायची असते. पण त्यासाठी वेळ न देता सोमवारी रात्री घाईने ते मंजूर केले गेले. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, हा मुद्दा शेकापचे जयंत पाटील यांनी मांडला. त्याला अनुमोदन देत या विधेयकावर मला बोलायचे होते व मी तयारीही केली होती. पण सभागृहाचे काम आठ वाजता संपणार असल्याचे सांगितल्यावर आपल्याला आज संधी मिळणार नाही, असे वाटल्याने पावणेआठला आपण निघून गेलो. पण कामकाज उशीरापर्यंत चालले आणि विधेयक मंजूरही झाले. मी केलेली तयारी फुकट गेली. विधेयकावर सर्वाना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, असे कदम म्हणाले.
पण दररोज सकाळी गटनेत्यांची बैठक आपण घेतो. त्यात कोणते कामकाज पूर्ण करायचे, हे ठरविले जाते. कामकाजाची माहिती आपल्या पक्षाच्या सदस्यांना देण्याची जबाबदारी गटनेत्यांची आहे, असे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी व अन्य सदस्यांनीही सांगितले. त्यावर अशी माहिती सदस्यांना मिळत नाही. एसएमएस किंवा अन्य माध्यमातून सभागृहात काय कामकाज सुरू आहे, बैठक कधी आहे, आदी माहिती मिळावी, अशी विनंती करण्यात आल्यावर माझ्या कार्यालयात योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे सभापतींनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा