पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यामुळे आलेली लेप्टोची साथ कमी होत असतानाच पुन्हा एकदा पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लेप्टोसोबतच डासांवाटे पसरणारे मलेरिया व डेंग्यूच्या साथींचाही प्रसार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लेप्टोचे योग्य निदान न झाल्याने अनेकांचे प्राण गेल्याच्या पाश्र्वभूमीवर आता साथीच्या रोगांवरील मार्गदर्शक तत्त्वे पालिका डॉक्टरांकडून घोटवून घेण्यासाठी आज, गुरुवारी केईएम येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुराच्या पाण्यातून जखमेवाटे संसर्ग होणाऱ्या लेप्टोची साथ जुलैच्या पहिल्या आठवडय़ात आली होती. या साथीमध्ये अनेकांचे प्राण गेले. महिनाभर पावसाने उसंत घेतल्याने ही साथ आटोक्यात आली. मात्र, मंगळवारी सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरात सर्वत्र पाणी साचल्याने लेप्टोच्या विषाणूंचा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे साचलेल्या पाण्यात एडीस व अ‍ॅनाफेलिस या डासांची उत्पत्ती होण्याचीही शक्यता आहे. साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याचदरम्यान औषधाने बऱ्या होणाऱ्या लेप्टोचे निदान योग्य वेळेत होऊ न शकल्याने अनेकांचे प्राण गेल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील डॉक्टरांना पुन्हा प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरुवारी केईएममध्ये होत असलेल्या या प्रशिक्षणात साथीच्या आजारांची लक्षणे व त्यावर उपचारांसाठी केंद्र सरकारकडून घालून देण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वांची उजळणी घेण्यात येईल. निदान कसे करावे व कोणते उपचार सुरू करावेत याबद्दल डॉक्टरांच्या शंकांना यावेळी उत्तरे दिली जातील, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader