मुंबई : भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च रक्तदाब असलेल्या १० पैकी ४ लोक रक्तदाबाची नियमित तपासणी करत नाहीत. अशा लोकांना हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो. १८-५५ वयोगटातील ४० टक्के लोकांना त्यांच्या रक्तदाबाविषयी माहितीच नसते. अशा रूग्णांनी रक्तदाबाची नियमित तपासणी करणे, सोडियमचे प्रमाण कमी असलेला आहार घेणे, व्यायाम करणे, तणावमुक्त राहणे आणि उच्च रक्तदाबाचा सामना करण्यासाठी वजन नियंत्रित राखणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च’ व ‘जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील १८ ते ५४ वयोगटातील १० पैकी ४ लोकांनी त्यांच्या रक्तदाबाचे परीक्षण केले नाही. लीलावती हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सी. सी. नायर म्हणाले की, उच्च रक्तदाब हा सामान्य पातळीपेक्षा जास्त असला तर तो सायलेंट किलर ठरतो. ही एक धोकादायक स्थिती आहे कारण एखाद्याचा रक्तदाब सतत १८०/१२० एमएमएचजीपेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीचे डोके दुखणे, छातीत धडधड किंवा नाकातून रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे उद्भवतात.
उच्च रक्तदाबाच्या कारणांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असलेला आहार, ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, वय, अल्कोहोलचे सेवन, तसेच ठराविक औषधे आणि स्लीप एपनिया, लठ्ठपणा आणि धूम्रपान यांचा समावेश आहे. १० पैकी ४ उच्च रक्तदाब असलेले रुग्ण त्यांच्या रक्तदाब पातळी तपासणे टाळतात. अशा लोकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता जास्त. अंदाजे, १८ ते ५५ वयोगटातील ४० टक्के लोकांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हेच माहिती नसते. नियमित तपासणी करून उच्च रक्तदाबाचे वेळीच व्यवस्थापन हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
हेही वाचा…‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
मधुमेह व रक्तदाबाची नियमित तपासणी होणे गरजेचे असून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी अशा मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. रक्तदाबाची तपासणी करण्याकडे लोकांचा कल नसतो मात्र हाच रक्तदाब अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे याबाबत व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे पालिकेच्या शिव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. उच्च रक्तदाबाचा सामना करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यात चालणे, सायकलिंग, पोहणे यातील जे शक्य असेल ते केले पाहिजे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी योग आणि ध्यान निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते. वजन नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धूम्रपान, मद्यपान टाळणे आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे असेही डॉ. मोहन जोशी म्हणाले.