मुंबई : भारताला स्वातंत्र्याच्या मिळाल्याच्या ७८ वर्षांनंतर देशातील जनता एखाद्या भाषणामागील अर्थ समजून घेण्याएवढी पुरेशी सुशिक्षित आणि शहाणी झाली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, रविवारी साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्यानिमित्त मालेगावात सकल हिंदू समाजाला कार्यक्रम आयोजित करण्यास आणि या कार्यक्रमाला मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी व माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्यासही परवानगी दिली.

कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, कोणत्याही धर्माला लक्ष्य केले जाणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या कार्यक्रमाच्या आयोजन समितीला दिले. तसेच, साध्वी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास परवानगी देताना स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७८ वर्षांत देशाने केलेल्या विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची तसेच तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीमध्ये वाढत्या जागतिक प्रभावाची जगाने दखल घेतली आहे. त्यामुळे, शहाणपण हे सुसंवाद वाढविण्यात आणि धार्मिक विविधतेचा आदर करण्यात आहे. जगा आणि जगू द्या या तत्त्वाने समाजाला शांततापूर्ण सहअस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

तत्पूर्वी, कोणतेही प्रक्षोभक भाषण कार्यक्रमादरम्यान केले जाणार नाही, अशी हमी कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. दुसरीकडे, परवानगी दिली गेल्यास शांतता राखण्याच्या दृष्टीने कठोर अटी लादण्यात याव्यात, असा आग्रह सरकारी वकिलांनी केला. त्याची दखल घेऊन गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी एक विशिष्ट मार्ग निश्चित करण्याचे आणि पुरेशी सुरक्षा राखण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. अटी किंवा कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. आवश्यकता असल्यास विशेष सुरक्षा पथकाही तैनात कऱण्याचे आदशेही न्यायालयाने पोलिसांना दिले.

प्रकरण काय ?

सकल हिंदू समाजाचे समन्वयक राहुल बच्छाव यांनी परवानगीसाठी याचिका केली होती. तसेच, मालेगाव येथील सटाणा नाका येथील यशश्री कंपाउंड येथे गुडीपाडव्यानिमित्त सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. तथापि, कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून पोलिस अहवालाच्या आधारे कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मिलिंद एकबोटे यांच्यासह काही वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा इतिहास असल्याचेही पोलिसांनी परवानगी नाकारताना नमूद केले होते. तसेच, गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच रमजान ईद आहे. शिवाय, एप्रिलमध्ये इतर धार्मिक सण आहेत आणि मालेगावमधील जातीय तणावाचा इतिहासाच्या पार्श्वभूमीवर २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीच्या उपस्थितीमुळे सुरक्षितेबाबतही पोलिसांनी चिंता व्यक्त केली होती.

कार्यक्रमाच्या वेळेतही बदल

पोलिसांनी व्यक्त केलेल्या सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने हा कार्यक्रम सायंकाळऐवजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्याचे आदेश आयोजकांना दिले. आयोजन समितीने मालेगावच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना कोणत्याही भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, असे हमीपत्र सादर करण्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.