मुंबई : हास्यकलाकार कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.कामरासारख्या उपहासात्मक राजकीय टीका-टिपण्णी करणाऱ्या हास्य कलाकारांवर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ऐकण्यास नकार देताना मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट केली. कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने अटकेपासून आधीच अंतरिम संरक्षण दिले आहे. शिवाय, गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका केली आहे. तो गरीब किंवा अशिक्षित नाही, असे असतानाही याचिकाकर्ते त्याच्या बाजूने का लढत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करून खंडपीठाने याचिका ऐकण्यास नकार दिला

तत्पूर्वी, एका हास्यकलाकाराने राजकीय व्यक्तीवर विडंबनात्मक गाणे गायल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या .मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. तसेच, सत्ताधारी पक्षाशी संबंधित अनेक राजकीय पुढाऱ्यांनी कामरा याच्या गाण्याची चित्रफित इतरांना पाठवणाऱ्या किंवा प्रसिद्ध करणाऱ्या कोणाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर, चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्यांवर किंवा ती इतरांना पाठवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले. तथापि, कामरा याच्या गाण्याची चित्रफित इतरांना पाठवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचे कोणतीही घटना निदर्शनास आलेली नाही. कामराने गुन्हा रद्द करण्यासाठी आधीच न्यायालयात धाव घेतली आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षणही कायम आहे. विनोदाशी संबंधित हा कार्यक्रम चित्रीत करण्यात आलेल्या स्टुडिओच्या तोडफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आल्याचेही खंडपीठाने आदेशात नमूद केले. तसेच, या टप्प्यावर ही जनहित याचिका विचारात घेण्यास योग्य नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने ती निकाली काढत असल्याचेही न्या स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यांच्या मागण्या कामराविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विधि शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने ही जनहित याचिका केली होती. कामरा या केलेली टिपण्णी अथवा भाषण भारतीय संविधानाच्या कलम १९ अंतर्गत,अभिव्यक्ती स्वातंत्र संरक्षित असल्याचे जाहीर कऱण्याची मागणी याचिकेत केली होती. कामरा याचे वक्तव्य उपहासात्मक आणि मिश्किल राजकीय टीका या दोन्हींच्या कक्षेत येते आणि ते घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे संरक्षित आहे. त्यामुळे, अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा दावा याचिकेत केला होता.